धक्कादायक : पाटेठाणकडे ऊस घेऊन चाललेला ट्रॅक्टर भीमा नदीपात्रात ट्रॉलीसह कोसळला, राहू येथील 1जण जागीच ठार



दौंड/शिरूर : सहकारनामा ऑनलाइन

शिरूर आणि दौंड तालुक्याला जोडणाऱ्या भीमा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यावरून विठ्ठलवाडी जवळ उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह भीमा नदीपात्रात कोसळून यात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विठ्ठलवाडीहुन पाटेठाणकडे ऊस घेऊन ट्रॅक्टर चालला होता. यावेळी हा ट्रॅक्टर सोपान गोरे नामक चालक चालवत होता. ट्रॅक्टर भीमा नदीवर असणाऱ्या बंधाऱ्यावरून जात असताना तो खाली नदीच्या पात्रात कोसळला. यातून ट्रॅक्टर चालक बचावला मात्र त्याच्या शेजारी बसलेले इसम उत्तम छबूराव नाटकर (वय ५०, रा. राहू, ता. दौंड) यांचा यात मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

दौंड-शिरूरला जोडणाऱ्या  विठ्ठलवाडी येथील भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा हा जड वाहतूक करण्यासाठी धोकादायक बनला होता, त्यामुळे त्या बंधाऱ्यावरील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामपंचायतीने केली होती व बंधाऱ्यावरील धोकादायक वाहतुक ही  वर्षभरापासून पाटबंधारे विभागाने बंद केली होती.

मात्र पर्यायी व्यवस्था सुरू असताना व पाटबंधारे विभागाचे बॅरिकेट लावलेले असतानाही काहींनी विठ्ठलवाड जवळ  बंधाऱ्यावरील बॅरिकेड  खोदून काढल्याने या धोकादायक पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू झाली होती. आज या बंधाऱ्यावरून जाताना ट्रॅक्टर ट्रॉलीसह भीमा नदीपात्रात कोसळून एकाला आपला जीव गमवावा लागला आहे.