देश-विदेश
भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडर स्तरावरील चर्चेची 17 वी फेरी 20 डिसेंबर 2022 रोजी चुशुल-मोल्डो इथे पार पडली. याआधी 17 जुलै 2022, रोजी झालेल्या बैठकीनंतरच्या प्रगतीचा आढावा घेत दोन्ही बाजूंनी पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेशी संबंधित मुद्द्यांचे निराकरण करण्यासाठी खुल्या आणि रचनात्मक पद्धतीने विचार विनिमय केला.
पश्चिम क्षेत्रातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रगती व्हावी या उद्देशाने उर्वरित समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी कार्य करण्याच्या दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वाने केलेल्या मार्गदर्शनानुसार या बैठकीत स्पष्ट आणि सखोल चर्चा करण्यात आली.
दरम्यान, दोन्ही बाजूंनी पश्चिम क्षेत्रात सुरक्षा आणि स्थैर्य राखण्याला सहमती दर्शवली. एकमेकांच्या निकट संपर्कात राहण्याचे आणि लष्करी आणि राजनैतिक माध्यमांद्वारे संवाद कायम ठेवण्याचे त्याचप्रमाणे उर्वरित मुद्यांवर लवकरात लवकर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी काम करण्याचे दोन्ही बाजूनी मान्य केले.