देश-विदेश : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. या करारांमुळे १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.
दावोस येथे आत्तापर्यंत करण्यात आलेल्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
दुसरी मोठी गुंतवणूक ७१,७९५ कोटी रुपये इतकी अॅमेझॉन करणार आहे. डेटा सेंटर्सच्या माध्यमातून या गुंतवणुकीतून ८३,१०० इतके रोजगार निर्माण होणार आहेत. या एकूण करारांपैकी उद्योग विभागाने ११.७१ कोटींचे, एमएमआरडीएने ३.४४ लाख कोटी तर सिडकोने ५५,२०० कोटींचे करार केले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान भेट घेतली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली.