दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहरातील 15% व्याजाने पैसे देणाऱ्या खाजगी सावकाराला दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. निलेश उर्फ केशव गायकवाड (रा.गोवा गल्ली दौंड) असे अटक खाजगी सावकाराचे नाव आहे.
सोमनाथ सुरेश खानापुरे( रा.राज्य राखीव पोलीस वसाहत दौंड.) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदरची कारवाई केली आहे.
घटनेबाबत दौंड पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सोमनाथ खानापुरे यांना सलूनचे दुकान टाकावयाचे होते त्यामुळे त्यांनी निलेश यांच्याकडून 1 लाख 90 हजार रुपये महिना 15% टक्के व्याजाने घेतले होते. पैसे देताना फिर्यादी यांच्याकडून बँकेचे चेक घेण्यात आले, परंतु फिर्यादी यांचे सलून दुकान टाकण्याचे रद्द झाले.
त्यामुळे फिर्यादी यांनी निलेश गायकवाड यास वेळोवेळी पैसे परत केले आहेत, असे असूनही आरोपी फिर्यादी कडे 6 लाख 50 हजार रुपयाची मागणी करीत होता. तुझ्याकडे व्याजासहित 6 लाख 50 हजार रुपये झालेले आहेत हे पैसे दे नाहीतर तू दिलेले चेक बँकेत जमा करून तुझ्या विरोधात केस करीन व जीवे मारण्याची धमकी फिर्यादी यास देण्यात आली. अशी धमकी दिल्याने फिर्यादी सोमनाथ घरातून बेपत्ता झाले होते.
परंतु दिनांक 22 रोजी फिर्यादी सोमनाथ यांनी दौंड पोलीस स्टेशन ला येऊन खाजगी सावकार निलेश गायकवाड याच्या विरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी निलेश यास अटक केली आहे, आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दिनांक 26 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश खरात करीत आहेत.
शहरातील आणखी कोणाला खाजगी सावकारांकडून त्रास किंवा धमक्या देण्यात येत असतील तर त्यांनी दौंड पोलिसांना संबंधितांची माहिती द्यावी त्यांच्यावरही कडक कायदेशीर करण्यात येईल असे खरात यांनी आवाहन केले आहे.