वाळू माफियांवर दौंड पोलिसांची करडी नजर, 15 लाख 45 हजारांचा मुद्देमालासह तिघांवर गुन्हा दाखल



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दौंड हद्दीतील भीमा नदी पात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उत्खनन करणाऱ्या व वाळूची अवैद्य वाहतूक करणाऱ्या वाळू माफियां विरोधात दौंड पोलिसांनी कायद्याचा बडगा उगारला आहे. 

वाळू माफियांवर करडी नजर ठेवीत नदीपात्रातून बेकादेशीर पणे वाळू उत्खनन करणाऱ्या व चोरीची वाळू खरेदी करून  अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विरोधात दौंड पोलिसांनी गुन्हे दाखल करीत त्यांच्या गाड्या जप्त करण्याची मोहीमच चालू केली आहे. 

त्याच अनुषंगाने दि. 21 फेब्रु.रोजी पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाने पो. उपनिरीक्षक सुशील लोंढे व पो. कॉ. किरण डुके यांनी दौंड हद्दीतील लिंगाळी व खोरवडी परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या तीन ट्रक पकडून त्यांच्या मालकां विरोधात भा.द.वि.379 तसेच पर्यावरण व खाण खणी अधिनियमान्वये गुन्हे दाखल करीत 15 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सिताराम शंकर जाधव (वय56,रा. गिरीम), नवनाथ विठ्ठल तरंगे (वय 35,रा. गिरीम), समीर विठ्ठल पवार (वय 30,रा. वरवंड) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली. पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शना खाली पो. हवा. पांडुरंग थोरात व पो. ना. दाभाडे पुढील तपास करीत आहेत.