अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात दौंड पोलिसांची विशेष मोहीम ! वाळू माफियांसह सर्वच अवैध धंदे करणाऱ्यांना मोठा दणका, 15 दिवसात 39 जणांविरोधात गुन्हे दाखल करत 14 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त



|सहकारनामा|

दौंड : (अख्तर काझी)

शहर व परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यां विरोधात दौंड पोलिसांच्या कारवाईने चांगलाच  वेग घेतला आहे. मागील 15 दिवसांमध्ये दौंड पोलिसांनी वाळू माफिया सह गावठी दारू भट्ट्या वाले,  पत्त्यांचे जुगार अड्डे चालविणारे, तसेच लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या विरोधात विशेष मोहीम राबवुन कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहेत.

दौंड पोलिसांनी तालुक्यातील खडकी गावातील सूर्या लॉजवर धाड टाकीत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या तीन जणांना अटक करून पिटा कलमान्वये गुन्हा दाखल करीत एका मुलीची या व्यवसायातून सुटकाही केली आहे. शहरातील जुगार अड्ड्यावर धाड टाकीत महाराष्ट्र जुगार बंदी अधि नियमानुसार चार केसेस मधील 11 आरोपींना अटक करून 17 हजार 805 रु चा मुद्देमाल जप्त केला आहे. येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू  उपसा करणाऱ्या दोन आरोपींवर गुन्हा दाखल करून 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच दौंड पोलीस स्टेशन हद्दीत गावठी दारू विक्रीचा अवैध व्यवसाय करणाऱ्या 18 केसेस मध्ये 23 आरोपींना अटक करून तब्बल 6 लाख 62 हजार 246 रु चा माल जप्त केला आहे.

पुणे जिल्हा ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, दौंडचे उप. अधीक्षक राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली व दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, खरात, लोंढे, पालवे तसेच सहाय्यक फौजदार भाकरे, गायकवाड, शिंदे, जाधव व पोलीस हवालदार थोरात, गुपचे, चव्हाण, जाधव, गावडे, गायकवाड, राऊत, मलगुंडे, होले, शिंदे, बंडगर यांचा कारवाईत सहभाग होता.