मुंबई : सहकारनामा
महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही यादी जाहीर करण्यात आली असून शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील 34 लाख 83 हजार 908 खात्याची माहिती संकलित केली. त्यापैकी 68 गावातली यादी जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना प्रमाणपत्र दिलं जात आहे. जिल्हा पातळींवर कर्जमाफीचं काम सुरु झालं आहे. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (23 फेब्रुवारी) सांगितलं होतं. ते म्हणाले होते की, “दोन लाखापर्यंतच्या कर्जमुक्तीची उद्या (24 फेब्रुवारी) जाहीर होणारी यादी ही पहिली असेल, अंतिम नाही. अफाट काही तरी जाहीर करायचं आणि ते पेलत नाही म्हणून उताणं पडायचं, अशी आमची वृत्ती नाही. मागील सरकारमध्ये आम्हीही होतो. त्यावेळी त्यांनी जी कर्जमाफी योजना केली होती ती अजून सुरु होती. त्यामुळे आम्ही जे ठरवलं आहे ते नियोजित वेळेत पूर्ण करु.”
कर्जमाफीसाठी एकूण 25 हजार कोटींची तरतूद
विधानसभेत आज 24 हजार 723 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. या पुरवणी मागण्यांमध्ये महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेसाठी 15 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील आठवड्यात आकस्मिक निधीतून 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. अशाप्रकारे एकूण 25 हजार कोटी रुपयांची तरतूद कर्जमाफीसाठी करण्यात आली. त्यावर आता 27 फेब्रुवारी आणि 2 मार्च रोजी चर्चा होणार आहे.