बारामती : जेवण न दिल्याने दारुड्यांचा हॉटेलवर हल्ला, 15 जणांवर गुन्हा दाखल



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

जेवण न दिल्याच्या कारणावरून मद्यपींनी आचारी, वेटरला बेदम मारहाण करून हॉटेलचे 3 लाखांचे नुकसान केले आहे. ही घटना बारामती मधील शिरवली येथे रविवारी घडली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

शिरवली हद्दीत असणाऱ्या विजय रेस्टॉरंटमध्ये पाच ते सहा दारुडे आले व त्यांनी हॉटेल मालक तावरे यांना जेवणाची ऑर्डर दिली. यावेळी जेवणासाठी बंदी असून, फक्‍त पार्सल सुरू असल्याचे त्यांना  सांगण्यात आले. मात्र, मद्यपींनी येथेच जेवायला देण्याचा तगादा लावून बाचाबाची करत तावरे यांच्याशी झटापट केली. यावेळी लोकांनी समजूत काढत वाद मिटवला. त्यानंतर मालक तावरे हे आपल्या घरी गेले.

मद्यपींनी आणखी काही तरुणांना कार व मोटरसायकलवरून बोलावून घेत हॉटेलची तोडफोड करण्यास सुरुवात केली. यावेळी आचारी व वेटरने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता मद्यपींनी त्यांना मारहाण करीत काउंटरमधील 10 हजारांची रक्‍कम लंपास केली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. याबाबत 15 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करीत आहेत.