सावधान : 13 वर्षीय मुलीवर बलात्कार, सोशल मीडियावर मैत्री करताय मग हे वाचाच



मुंबई : सहकारनामा ऑनलाईन

सोशल मीडियावर मैत्री करणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय एका कुटुंबाला आला आहे. मुंबईच्या आग्रीपाडा येथे आपल्या मामाकडे आलेल्या अवघ्या 13 वर्षाच्या मुलीला सोशल मीडियाच्या मैत्रीमुळे मोठ्या भयानक संकटाचा सामना करावा लागला असून तिच्यावर अमानुष बलात्कार करण्यात आले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

हि 13 वर्षीय अल्पवयीन  मुलगी 1 जुलै रोजी घराबाहेर गेल्यानंतर पुन्हा घरी आलीच नाही त्यामुळे  तिच्या आजीने आग्रीपाडा पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. अवघ्या 13 वर्षांची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही त्वरित यंत्रणा कामाला लावून अपहरणाचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम आगवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गणेश जाधव, उपनिरीक्षक अभिजित टेकवडे यांच्यासह मंडलिक, कुंभार, महिला कॉन्स्टेबल वाकचौरे, शिंगटे यांची पथके तयार करण्यात येऊन सोशल मीडियाच्या टेक्निकल बाबी तपासण्यास सुरुवात करण्यात आली.  यावेळी तिच्याबाबत विविध ठिकाणी जाऊन तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान ही मुलगी काही महिन्यांपासून सोशल मीडियावर एका जगदीश पारेता नावाच्या तरुणाच्या मैत्रीत आलेली असून ती त्याच्याशी कायम संपर्कात असल्याचे पुढे आले. यामुळे पोलिसांनी टेक्निकल पुराव्यांवर भर देऊन या दोघांचे कॉल डीटेल्स काढले. त्यामध्ये आणखी काही तरुण जगदीशच्या संपर्कात असल्याचे समोर आले  आणि हे सर्वजण मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये असल्याची महत्वपूर्ण माहितीही समोर आली.

पोलिसांनी तातडीने एक पथक राजस्थानला पाठवून तेथे झालावाड या गावातून जगदीशला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्या इतर मित्रांना राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या राजगड येथून पकडण्यात आले. यावेळी  जी माहिती समोर आली ती सुन्न करणारी होती. सोशल मीडियावर झालेल्या मैत्रीनंतर या मुलीला एका जीपमधून मुंबईतून राजस्थानला नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर बलात्कार केला गेला अशी धक्कादायक माहिती या तपासातून पुढे आली. सोशल मीडियावर मैत्री करून प्रेमाच्या जाळ्यात ओढून या 13 वर्षीय मुलीवर राजस्थानमध्ये नेऊन बलात्कार करणाऱ्या नराधम जगदीश पारेता आणि त्याच्या चार मित्रांना आग्रीपाडा पोलिसांनी अटक केली  असून सोशल मीडियावर झालेली मैत्री या मुलीच्या आयुष्यावर बेतली असल्याचे समोर आले आहे.