मुंबई : मुंबईजवळ झालेल्या बोट दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला असून 98 जण जखमी झाले आहेत. मुंबईकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या या प्रवासी बोटला गेट वे ऑफ इंडियाजवळ अपघात झाला होता. या घटनेत आत्तापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. बचाव पथकाकडून 100 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळून जाणाऱ्या प्रवासी बोट आणि नौदलाच्या स्पीड बोटमध्ये अपघात झाला होता. या दुर्घटनेत 98 जण जखमी झाले आहेत. या जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर पाच जण अद्याप बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सात पुरुष, चार महिला व दोन बालकांचा समावेश आहे.
अरबी समुद्रातील बुचर आयलंड परिसरात ‘नीलकमल’ कंपनीच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिली. त्यामुळे भीषण अपघात झाला. दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी ही दुर्घटना घडली. यानंतर बोटीवरील १०१ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नौदल, कोस्ट गार्ड आणि पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू केल्याने मोठी दुर्घटना टळली. आता या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला, त्यांची नावे काय, कोणत्या रुग्णालयात किती लोकांवर उपचार याची माहिती समोर आली आहे.
मृत व्यक्तींची नावे
१) महेंद्रसिंग शेखावत ( नेव्ही)
२) प्रवीण शर्मा (NAD बोट वरील कामगार)
३) मंगेश(NAD बोट वरील कामगार)
४) मोहम्मद रेहान कुरेशी (प्रवासी बोट)
५) राकेश नानाजी अहिरे( प्रवासी बोट)
६) साफियाना पठाण मयत महिला
७) माही पावरा मयत मुलगी वय-३ तीन
८) अक्षता राकेश अहिरे
९) अनोळखी मयत महिला
१०) अनोळखी मयत महिला
११) मिथु राकेश अहिरे वय- ८ वर्षे
१२) दिपक व्ही.
१३) अनोळखी पुरुष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मदतीची घोषणा –
या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या दुर्घटनेची सखोल चौकशी राज्य सरकार आणि नौदलाकडून केली जाईल असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.