मुंबई :
राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक (PSI) होण्याचे स्वप्न आता पूर्ण होण्याच्या आशा पल्लवित होताना दिसत आहेत. राज्य शासनाने याबाबत महत्त्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली आहे.
प्रथमदर्शनी पाहता या निर्णयामुळे पोलीस शिपाई पदावरील कर्मच्यांना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचता येणार असल्याने पोलिसांचे मनोधैर्य व आत्मबल वाढून त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होणार आहे.
राज्यात अनेक वर्षे पोलीस दलात सेवा केल्यानंतरही हजारो पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षक या महत्वाच्या पदावर पोहचता येत नव्हते. पण आता मात्र राज्यसरकारने याबाबत ठोस निर्णय घेतल्याने आता राज्यातील जवळपास 45 हजार हवालदार तसेच सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून दसऱ्याच्या मुहूर्तावर हि माहिती प्रसिद्ध झाल्याने पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अंमलदारांच्या घरात दसऱ्याच्या दिवशीच दिवाळीचे वातावरण तयार झाले आहे.
राज्य सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे पोलीस शिपाई श्रेणीतील अंमलदारांना कमी कालावधीत पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येणार आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिन्यांपासून या प्रस्तावावर काम सुरू ठेवले होते. हा प्रस्तवा समोर आल्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्यात यावी व शासन निर्णयही निर्गमित करण्यात यावा, अशा सूचना देऊन हा प्रस्ताव आज मंजूर केला आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर हा निर्णय आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.