- संपादकीय :
सोशल मीडियावर खास करून व्हाट्सअप्प, फेसबुक ग्रुपवर कोरोना, रोजगार, नोकरी, शेती-शेतकरी, व्यवसाय, धंदे अशा अनेक विषयांवर चर्चा होताना, पोस्ट व्हायरल होताना दिसतात मात्र सध्या या सर्व पोस्ट कमी होत असून जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट जास्त व्हायरल होताना दिसत आहेत.
व्हाट्सअप्प, फेसबुक हे माध्यम अँड्रॉइड मोबाईल वापरणारे जवळपास 90% लोक वापरतात यात शंका नाही. या व्हाट्सअप्प, फेसबुक मध्ये जसजसे नवनवीन फिचर ऍड होत गेले तसतशी त्याची लोकप्रियता आणखीनच वाढत गेली. व्हाट्सअप्प वर अगोदर 100 लोकांचा ग्रुप तयार करता येत होता आता जवळपास अडीचशे लोकांचा ग्रुप सहज तयार करता येतो.ग्रुप तयार करणारा चांगल्या उद्देशाने ग्रुप तयार करत असतो मात्र त्यामध्ये जॉईन होणारे सदस्य हे मात्र वेगवेगळ्या विचारांचे पाहायला मिळतात.
कोणताही एक विषय असला की त्यावर विविध प्रतिक्रिया येणार हे ठरलेलच असतं यालाच लोकशाही असेही म्हणतात, मात्र सध्या टेक्निकल विषयांवर कमी आणि धार्मिक विषयांवर जास्त फोकस केला जात असल्याचे अनेक पोस्टवरून समोर येत आहे. विषय कोणताही असला की त्याला जातीय, धार्मिक रंग द्यायचा प्रयत्न काहीजण करताना प्रत्येक ग्रुपवर दिसतेच. मग यात कधी दोन जातींमध्ये चर्चा केली जाते किंवा मग दोन धर्मांमध्ये आणि मग यातून हा धर्म किती वाईट, याची धोरणे किती वाईट यावर भाष्य करून दोन समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल हे पाहिले जाते.
धर्म कोणताही असो तो काहीच वाईट शिकवण देत नाही मात्र त्या धर्माला मानणारे मात्र स्वतःच्या मर्जीप्रमाणे धर्माची व्याख्या बदलून त्या धर्माला वाईट करतात हेही विसरता कामा नये. हे सर्व होत असताना आपल्या देशात एकी टिकवून ठेवण्याचे जे स्वप्न या अगोदरच्या पिढ्यांनी पाहिले होते त्या स्वप्नाला आता कुठेतरी तडा जातो की काय अशी भीती निर्माण होत आहे. कारण व्हाट्सअप्प, फेसबुकवरचे ग्रुप उघडले की जातीवादी पोस्ट, जातीवादी लिखाण आणि जातीवादी कमेंट पाहून मन बेचैन होते. आपल्या देशात जेथे हम सब एक है हा नारा दिला जातो, त्याच देशात दोन जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी पिलावळही सुप्त अवस्थेत कार्यरत आहे हे पाहून निश्चितच मनाला वेदना होतात.