काय सांगता..! इन्शुरन्सचे 7 लाख रुपये मिळविण्यासाठी पठ्ठ्याने स्वतःच्याच गाडी चोरीचा केला बनाव, स्थानिक गुन्हे शाखा आणि सासवड पोलीसांनी आणली लबाडी उघडकीस

  • पुरंदर :
    या जगात पैशासाठी कधी, कोण, काय करेल याचा काहीच नेम नाही. आता हेच पहा ना इन्शुरन्स कंपनीचे सात लाख रुपये मिळविण्यासाठी एका पठ्ठ्याने चक्क स्वतःचीच कार चोरीला गेल्याचा बनाव केला मात्र चतुर पोलीसांनी त्याला हेरून त्यावरच गुन्हा दाखल केला आहे.
    मिळालेल्या माहितीनुसार दिनांक.२८/९/२०२१ रोजी फिर्यादी सत्यशील सुरेश जाधव, (वय ३७ वर्षे, रा. डी.वाय. पाटील कॉलेज जवळ, पिंपरी, पुणे) याने आपली हुंडाई मोटार कंपनीची xcent कार क्र एम एच १४ एफ बी ४२०९ ही सासवड जेजुरी रोडवर शिवरी गावच्या अलीकडे रोडवरुन दि.२७/९/२०२१ रोजी चोरीस गेली असल्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार सासवड पोलिस स्टेशन गु र नं ३७४/२०२१ भा द वि का कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरील गुन्ह्याचा पोलीस समांतर तपास करीत असताना फिर्यादी सत्यशील सुरेश जाधव यास पोलीसांनी तपास कामी बोलावून घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी करून सदर गुन्ह्याबाबत माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला आणि त्यांनी जाधव यास विश्वासात घेऊन तपास केला असता आश्चर्यकारक माहिती समोर आली.
    जाधव याचा आपली गाडी चोरीस गेली असे दाखवून इन्शुरन्स कंपनी कडून इन्शुरन्सची ७ लाख रुपये मिळवायचे असा त्याचा उद्देश होता. सदरील गुन्ह्यातील चोरीस गेलेली गाडी त्याने हडपसर येथील तुकाई टेकडी या परिसरात उभी करून झाकून ठेवली असल्याचे सांगितले. पोलीसांनी सदर गाडी ताब्यात घेत आरोपी सत्यशील सुरेश जाधव यास पुढील तपासकामी सासवड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सासवड पोलिस करीत आहेत.
    सदर कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, तसेच अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके सासवड पोलिस स्टेशन, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप, पो हवा विजय कांचन, पो हवा अजय घुले, पो ना गणेश पोटे, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.