दौंड : राहू जवळील रामनगर मगरवाडी (ता.दौड) येथे बारा ते चौदा महिन्याच्या बारा एकर आडसाली ऊसास सोमवारी दुपारी शार्टसर्कीटमुळे आग लागली. वातावरणातील उष्णतेमुळे हा ऊस जळुन खाक झाला.
रामनगर येथील शेतकरी मनोहर मगर, गणेश मगर, रविंद्र मगर, ज्ञानेश्वर मगर, पंढरीनाथ मगर, विठ्ठल मगर, चंद्रकांत मगर या शेतकऱ्यांचा प्रत्येकी दीड ते दोन एकर उस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
कारखान्यांवर यंदा उसाला चांगले बाजारभाव मिळतील या आशेने ऊस शेतकऱ्यांनी गाळपासाठी राखुन ठेवले होते.
परंतु आगीमुळे आता गुर्हाळाला ५००-७०० रु प्रतीटन कमी बाजारभावाने ऊस द्यावा लागतोय तर उसतोड कामगारांना अतिरिक्त एकरी १० हजार रु द्यावे लागणार आहेत. असे एका शेतकर्याचे ७०-८० हजाराचे नुकसान झाले. जिवापाड जपलेल्या उसास आग लागल्याने आर्थिक फटका बसला आहे. आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या उसास भरपाई मिळण्याची मागणी युवा नेते दिंगबर मगर यांनी केली आहे.