जम्मू काश्मीरमध्ये भीषण दुर्घटना, 11 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधील डोडा येथील थात्री जवळ एक मिनी बस दरीत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मोदी यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून सानुग्रह मदतही मंजूर केली  आहे.

पंतप्रधान कार्यालयाने माहिती प्रसिद्ध करताना “जम्मू आणि काश्मीरमधील डोडा येथील थात्री जवळ झालेल्या रस्ते अपघातामुळे मी दु:खी झालो आहे. या दुःखद प्रसंगी मी शोकाकुल कुटुंबांप्रती  शोक  संवेदना व्यक्त करतो. जे लोक जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे होवोत  अशी मी प्रार्थना करतो असे म्हटले असून जम्मू आणि काश्मीरमधील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय  मदत निधीमधून प्रत्येकी 2 लाख रुपये सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना 50,000 रुपये देण्यात येतील असे जाहीर करण्यात आले आहे.