ऊस तोडीच्या नावाखाली पारगाव येथील शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक

दौंड : ऊस तोडीसाठी तुम्हाला टोळी देतो तुम्ही मात्र त्यासाठी आम्हाला ऍडव्हान्स द्या असे म्हणत दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर उघडकीस येऊ लागले आहेत. असाच एक प्रकार पारगाव (सालू मालू) येथील रामदास गोविंद ताकवणे यांच्या सोबत घडला असून त्यांच्या फिर्यादीवरून रमेश तोताराम राठोड (रा.नाळबंदी, ता.भडगाव, जि. जळगाव) याच्यावर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते त्यामुळे येथे ऊस तोडीसाठी कायमच ऊसतोड टोळ्यांची मोठी गरज भासत असते. याचाच गैरफायदा काही ठग घेत असून शेतकऱ्यांना ऊसतोड टोळी देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळले जातात आणि काही दिवसांत ऊसतोड टोळी घेऊन येतो असे म्हणून जे ठग पसार होतात. पैसे दिलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना संपर्क साधला तर त्यांना अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि जर तरीही शेतकऱ्याने त्यांना फोन केले तर मात्र त्यांना शिवीगाळ केली जाते असा अनुभव अनेक शेतकरी कथन करत आहेत.

ऊसतोड टोळी देण्याच्या बहाण्याने आपली मोठी रक्कम घेऊन गेलेल्या इसमाला शोधण्यासाठी जर त्यांच्या गावाकडे शेतकरी गेले तर त्यांना मारहाण करणे, त्यांचे पैसे काढून घेणे, त्यांची वाहने फोडणे असले प्रकारही अनेकवेळा घडल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे अश्या ठगांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.