लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)
पुणे-सोलापूर महामार्गावर कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील थेऊर फाटा येथे एका पेट्रोल डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (ता.२) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
ही आग टँकरला शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या आगीमध्ये दहा हजार लिटर पेट्रोल व टॅंकरचे नुकसान झाले आहे. या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकर क्रमांक एम एच १२ एम एक्स ७११६ हा श्रीकांत राजेंद्र सुंबे यांच्या मालकीचा आहे. हा टँकर हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करतो. मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास टँकरमध्ये एचपीसीएल या कंपनीतून डिझेल पेट्रोल भरण्यात आले होते. व पुढे टॅंकर महाबळेश्वर येथील ईराणी पेट्रोल पंप येथे पेट्रोल व डिझेल घेऊन जाणार होता. परंतु घाट-रस्ता व रात्रीचा प्रवासामुळे सदरचा टँकर मालक श्रीकांत सुंबे यांच्या मालकीचे थेऊर फाटा येथील पार्किंगमध्ये आठ वाजण्याच्या सुमारास लावण्यात आला होता. व पहाटे महाबळेश्वर साठी जाणार होता.
मंगळवारी (२) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास टँकरला शॉर्टसर्किट मुळे आग लागून टँकरने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये टँकर सह नऊ हजार लिटर डिझेल व दहा हजार लिटर पेट्रोल जळून नुकसान झाले आहे. प्रसंगावधान साधून टँकरच्या शेजारी असणाऱ्या २ ट्रक लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने सुरक्षित बाजूला काढण्यात आल्या.
दरम्यान आगीची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलिस यांच्यासह पीएमआरडीए अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला.
त्याचवेळी हवेलीच्या पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन परिस्थिती आटोक्यात आणली.