मुंबई : सहकारनामा
सध्या महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. विविध जिल्ह्यांमध्ये सापडणारे कोरोना रुग्ण हि प्रशासनाची डोकेदुखी ठरत असताना आता नुकत्याच आलेल्या अहवालावरून तर सर्वांना विचार करायला लावणारी आकडेवारी समोर आली आहे.
आलेल्या आकडेवारीनुसार देशातील 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त कोरोना रुग्ण सापडत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, नांदेड, औरंगाबाद आणि नागपूर या 8 जिल्ह्यांचा समावेश आहे तर देशातील इतर राज्यात दिल्ली आणि बेंगळूरु शहर हे रुग्णसंख्या वाढीत आघाडीवर आहे. यात नागरिक अजूनही कोरोनाला हलक्यात घेत असल्याने त्याची व्याप्ती वाढू लागली आहे, तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायजरचा वापर करणे, सोशल डिस्टनसिंग ठेवणे, गर्दी टाळणे हे होताना दिसत नाही त्यामुळे नागरिकांची बेफिकिरी भोवणार असे एकंदरीत चित्र सध्या दिसत आहे.
मागील आठ दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील कोरोनाचा फैलाव 23% टक्क्यांवर पोहोचला आहे तर त्यानंतर पंजाब (8.82 टक्के), छत्तीसगढ (8 टक्के), मध्य प्रदेश (7.82 टक्के), तमिळनाडू (2.50 टक्के), कर्नाटक (2.45 टक्के), गुजरात (2.2 टक्के), दिल्ली (2.4 टक्के) या राज्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव जास्तच आहे. सध्या देशात एकूण सरासरी कोरोना संसर्ग 5.65 टक्के असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी दिली.
नागरिकांची बेफिकिरी भोवणार!
राज्यात सापडलेल्या कोरोना रुग्णांबाबत हयगय होताना दिसत आहे. कोरोना रुग्णांच्या विलगीकरणाकडे दुर्लक्ष केले जात असून त्या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात नाही आणि घरामध्ये विलगीकर केले तर त्यावर देखरेख ठेवण्यात येत नाही असेही आढळून येत आहे.
घरामध्ये ठेवण्यात आलेल्या कोरोना रुग्णांचे विलगिकरण योग्य पद्धतीने होत नसेल तर त्यांचे संस्थात्मक विलगीकरण हाच पर्याय असून राज्यांनी तातडीने त्याबाबत पाऊले उचलून अंमलबजावणी करावी असे निरीक्षणही भूषण यांनी पत्रकार परिषदेत नोंदवले आहे.
काहीही झाले तरी करोनाची परिस्थिती आटोक्यात आणावी लागणार आहे त्यासाठी राज्य शासनाने कायद्याचा कडक वापर करावा असा सल्ला भूषण यांनी शेवटी दिला आहे.