पुणे : सहकारनामा ऑनलाईन
आज रविवार दि. 9 ऑगस्ट रोजी पुण्याजवळ असणाऱ्या दिघी येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन 13 जण जखमी झाले आहेत. हा स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून या स्फोटामध्ये सात लहान मुलांचाही समावेश आहे.
मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार गॅस सिलेंडरमधून रात्रभर गॅस लिकेज राहील्याने हा स्फोट झाल्याचे सांगितले जात आहे. ही धक्कादायक घटना आज सकाळी 6:30 च्या सुमारास दिघी-भोसरीच्या महादेवनगर येथील अष्टविनायक सोसायटीमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत ज्ञानेश्वर टेमकर यांचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत असून त्यांच्या पत्नी मंगला टेमकर (वय 27), मुलगी अनुष्का टेमकर (वय 7), मुलगा यशश्री टेमकर (वय अडीच वर्ष), श्री सातपुते, सौ सातपुते, सातपुते यांचा मुलगा आणि मुलगी अशी एका घरातील जखमींची नावे आहेत तर दुस-या घरात असणारे पाचजण जखमी झाले आहेत. यामध्ये महेंद्र सुरवाडे, अर्चना सुरवाडे (वय 35), मुलगी आकांक्षा सुरवाडे (वय 15), मुलगी दीक्षा सुरवाडे (वय 13), मुलगा अमित सुरवाडे (वय 8) यांचा समावेश आहे.
दिघी-भोसरी हद्दीवर असलेल्या अष्टविनायक सोसायटीमध्ये भिंत पडली आहे. अशी वर्दी रविवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळाली. त्यानुसार, भोसरी अग्निशमन विभागाचे सिनियर फायरमन राजेंद्र गवळी, फायरमन विजय घुगे, श्रावण चिमटे, अभिषेक डिगे, हनुमंत पुरी, अनिल वाघ हे जवान एक बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाच्या मुख्य केंद्राचे दोन बंब दाखल झाले.
हा प्रकार केवळ भिंत पडल्याचा नसून गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याचे निदर्शनास आले. घटनेत एकूण 13 जण जखमी झाले. दरम्यान स्थानिक नागरिकांनी जखमींना पिंपरी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जखमींमध्ये तीन पुरुष, तीन महिला, दोन मुले आणि पाच मुलींचा समावेश आहे.
दोन्ही घरातील सर्व साहित्याची पडझड झाली आहे. भिंत पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. टेमकर यांच्या कुटुंबातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभागाला मिळाली आहे.