दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)
दौंड हद्दीमधील भीमा नदी पात्रांमध्ये यांत्रिक बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांना दौंड महसूल विभाग व पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे.
महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने वाळू माफियांच्या अवैध वाळू उपसा करण्यासाठी लागणाऱ्या 10 फायबर व 4 सेक्शन बोटी जिलेटिन च्या सहाय्याने उध्वस्त केल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे वाळू माफियांचे जवळपास दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर तब्बल 14 जणांवर भा.द.वि.कलम 379,511 तसेच गौण खनिज अधिनियम व पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
दौंड हद्दीतील वाटलुज भीमा नदीपात्रामध्ये नानासाहेब शेंडगे, ज्ञानदेव झिटे, सलीम शेख, महंमद शेख शरद शेंडगे (सर्व, रा. वाटलुज) हे आपल्याकडील 5 फायबर व 3 सेक्शन बोटींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करीत होते. यावेळी त्यांना महसूल विभागाची व पोलिसांची चाहूल लागताच या वाळू माफियांनी आपल्या बोटी भीमा नदी पात्रातच सोडून पळ काढला. संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना यांत्रिक बोटी पोलीस स्टेशनला आणणे शक्य नसल्याने जिलेटिनच्या साह्याने नदीपात्रातच त्या उध्वस्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे राजेगाव हद्दीमध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या चंद्रकांत लोखंडे, राहुल पाटील, बाबू मोरे, पप्पू ठुमस्कर, पप्पू उर्फ सतीश कवडे, भाऊ परंगे यांच्यावरही कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ठिकाणच्या कारवाईमध्ये 5 फायबर व एक सेक्शन बोट (कि.50 लाख रुपये) उद्धवस्त करण्यात आल्या आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशाने मळद(ता.दौंड) हद्दीतील ओढ्यामध्ये अवैध वाळू उपसा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्वजण मळद हद्दीतील ओढ्यामध्ये जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा करीत होते. पोलीस कारवाई दरम्यान वाळू माफियांनी जे सीबी पळून नेला परंतु पोलिसांनी ट्रॅक्टर व 40 हजार रुपये किमतीची वाळू असा 5 लाख 40 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पो. ना. दीपक वाईकर, सुभाष डोईफोडे, चंद्रकांत काळे तसेच पो.कॉ. राजेंद्र शिंदे व धनंजय गाढवे यांनी कारवाईत भाग घेतला