Need Oxygen In Covid center – केडगाव (दौंड) च्या कोविड सेंटरमध्ये 1 तासात ऑक्सजिन आले नाही तर अनेक रुग्ण दगावण्याची शक्यता! डॉक्टर म्हणतायत मी फक्त राडायचाच बाकी राहिलोय



| सहकारनामा |

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या कोविड सेंटर्सची अवस्था बिकट बनली असून या कोविड सेंटर्सना त्वरित ‛ऑक्सिजन’ न मिळाल्यास रुग्णाच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

या हॉस्पिटल मधील ऑक्सिजन जवळपास संपत आला आहे आणि 1 तासात जर ऑक्सिजन मिळाले नाही तर अनेकजण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे अशी माहिती मोहन जनरल हॉस्पिटल येथील कोविड सेंटर चालक डॉ.धिरेंद्र मोहन यांनी ‛सहकारनामा’शी बोलताना दिली आहे.

केडगाव येथील मोहन जनरल हॉस्पिटलमध्ये सध्या 50 ऑक्सजिन बेड असून 8 बेड हे व्हेंटिलेटरचे आहेत. सध्या या रुग्णालयात दररोज 150 ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे त्यामुळे प्रशासनाकडून 150 सिलेंडर ऑक्सिजनचा पुरवठा अपेक्षित आहे. मात्र गरजेपेक्षा अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन सिलेंडर येत असल्याने ऑक्सिजन ची गरज असणाऱ्या रुग्णांना अक्षरशा अर्ध्या प्रमाणात ऑक्सिजन देऊन त्यांचा जीव वाचविण्याचे प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती डॉ.मोहन यांनी दिली आहे.

प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करत असले तरी येथे ऑक्सिजन उपलब्ध का होत नाही हे समजत नाही, एक तासात जर ऑक्सिजन आले नाही तर हॉस्पिटल मधून मृतदेह बाहेर पडतील, मी आता राडण्याचाच बाकी आहे असा संताप आणि खंत यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.

ऑक्सिजन सिलेंडरचा गरजेनुसार पुरवठा सुरू आहे : तहसीलदार संजय पाटील

याबाबत दौंड तालुक्याचे तहसीलदार साहेब मा.संजय पाटील यांनी माहिती देताना प्रत्येक कोविड सेंटरला गरजेनुसार ऑक्सिजन पुरवठा केला जात असून जितके ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होत आहेत ते गरजेनुसार सर्व कोविड सेंटर (रुग्णालयांना) पुरवले जात असल्याचे सांगितले. तसेच काही कोविड सेंटर (रुग्णालयांनी) 25 ते 30 कोविड रुग्णांची परमिशन घेत कोविड सेंटर सुरू केले मात्र त्यापेक्षा जास्त रुग्ण त्यांनी दाखल करून घेतले असल्याने आणि त्याची माहिती प्रशासकीय यंत्रणेला न दिल्याने त्या ठिकाणी ऐनवेळी ऑक्सिजनचा तुटवडा  निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत असल्याचे त्यांनी सांगितले.